Login: 
Password:
Home All Questions Ask Question All Forums Recent Polls Users Register new user
News / समाचार (no Answer given) > हवामान अंदाजाची पीकव्यवस्थापनातील उपयुक्तता  

Quick Go »
Show Printable Version | e-mail this thread | Add To My Favorites | Watch this Thread
Author
Previous Thread 0 Replies 2556 Views Next Thread

mhajit

10+ Contributor
Pune
Maharashtra
India

  Joined: Jan 12, 2007
  Posts: 19
  Status: Offline

Farmer Name: Not Available
Farmer Phone: Not Available


हवामान अंदाजाची पीकव्यवस्थापनातील उपयुक्तता
   


लेखकः-  दिनकर जीवतोडे, डॉ. विजय इलोरकर

दक्षिण भारतात आलेल्या सुनामीसारख्या प्रलयंकारी चक्रीवादळामुळे हवामानशास्त्राची आवश्‍यकता व उपयुक्तता याबाबत सर्वसामान्य जनता व सरकार जागरूक झाले आहे. हवामान अंदाज त्वरित व अचूकपणे उपलब्ध व्हावा ही काळाची गरज बनली आहे.

"हवामानाचा अंदाज' हा शब्द जरी सर्वश्रुत असला, तरी त्यात नक्की कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असतो, याची माहिती करून घेणे फार महत्त्वाचे असते. यामध्ये अंतर्भाव असलेल्या प्रमुख बाबी म्हणजे ः

वातावरण ढगाळ किंवा स्वच्छ असण्याची शक्‍यता. उदा. ः पूर्णतः ढगाळ, अंशतः ढगाळ किंवा प्रामुख्याने स्वच्छ.
पावसाची शक्‍यता. उदा. ः काही ठिकाणी किंवा बहुतेक ठिकाणी किंवा सर्वत्र हलका किंवा मध्यम किंवा जोरदार पाऊस.

दिवसाच्या किंवा रात्रीच्या तापमानात होणारा बदल. उदा. ः उन्हाळा असेल तर प्रामुख्याने दिवसाच्या तापमानातील बदल विशेषतः सांगितला जातो. याचबरोबर अनुक्रमे उष्णतेची लाट किंवा थंडीची लाट याबाबतसुद्धा पूर्वसूचना दिल्या जातात.

हवेचा ताशी वेग, तसेच हवेची दिशा, वारे किती वेगाने वाहतील आणि त्यांची वाहण्याची दिशा कोणती याबाबत कल्पना दिली जाते. हवामानशास्त्रामध्ये वारा कोणत्या दिशेने येतो याला महत्त्व असते.

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन ः
नेहमीच्या हवामान अंदाजाव्यतिरिक्त काही खास हवामान अंदाजसुद्धा विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट भागासाठी वर्तविले जातात. हवामानाच्या अंदाजाला अलीकडे अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे आणि त्याची लोकप्रियतासुद्धा वाढत आहे, कारण संपूर्ण जगात शेती हा व्यवसाय प्रामुख्याने हवामानावरच अवलंबून आहे. त्यातही भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जेथे नैर्ऋत्य मोसमी पाऊस हाच आपल्या कोरडवाहू पिकाचे भवितव्य ठरवितो, त्या ठिकाणी हवामानाच्या अंदाजाला अधिकच महत्त्व आहे.

वेधशाळा ः
हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी दोन प्रकारच्या यंत्रणा राबविल्या जातात. यासाठी देशात ठिकठिकाणी हवामानशास्त्राच्या वेधशाळा स्थापन केलेल्या आहेत. प्रमुख वेधशाळांमध्ये हवामानाबाबतची वेगवेगळी निरीक्षणे दर दोन तासांनी नोंदविली जातात आणि ती माहिती हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या ठिकाणी त्वरित पाठविली जाते. या सर्व निरीक्षणांवरून तज्ज्ञमंडळी हवामानाचा अंदाज वर्तवितात.

दुसऱ्या प्रक्रियेत दररोज दोनदा निरीक्षणे घेतली जातात आणि ती दर तीन दिवसांनी नवी दिल्ली येथील प्रमुख राष्ट्रीय केंद्राला कळविली जातात. ती सर्व निरीक्षणे महासंगणकाला पुरविली जातात. अशा सर्व निरीक्षणांचा उपयोग करून महासंगणक त्या ठिकाणी पुढील तीन-चार दिवसांचे हवामान कसे राहील या अंदाजाची नोंद ठेवतो. त्यावरून त्या परिसरातल्या हवामानाचा अंदाज वर्तवला जातो.

अनुभवी आणि जाणकार शेतकरी काही बाबी प्रत्यक्ष उपयोगात आणू शकतात, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला अतिशय सुलभतेने हवामान अंदाजाचा फायदा व्हावा यासाठी संबंधित ठिकाणी तज्ज्ञमंडळींची एक समिती गठित केलेली असते. ही तज्ज्ञमंडळी हवामान अंदाजावर आधारित पीकवार कृषिविषयक सल्ला तयार करून निरनिराळ्या प्रसारमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करतात.

हवामान अंदाज व पीकव्यवस्थापन ः
शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज वर्तविताना सर्वप्रथम पावसाच्या अंदाजाचा विचार करावा लागेल. त्याचा उपयोग निरनिराळ्या बाबींसाठी करून घेता येईल. उदा. ः
जर अत्यल्प पाऊस सांगितलेला असेल तर, पिकाची पेरणी थोडी पुढे ढकलता येईल.
ओलिताखालील पिकाला ताण पडू नये म्हणून पाण्याची पाळी देता येईल.
पिकाची काढणी किंवा मळणी याबाबत विचार करता येईल.

मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर ः
ओलिताची नियोजित पाळी पुढे ढकलता येईल.
पीकसंरक्षणाचे उपाय लांबणीवर टाकावे लागतील.
वरखताची मात्रा पावसाआधी देता येईल.
ठिबक सिंचनाचे संच सुरू ठेवण्याची वेळ ठरविता येईल.

जास्त पाऊस अपेक्षित असेल तर ः
वरखताची मात्रा देणे लांबणीवर टाकावे लागेल.
ओलिताची पाळी पुढे ढकलावी लागेल.
पिकाला अति पाण्यामुळे नुकसान पोचू नये म्हणून शेतात चर खोदण्यासारखे उपाय अवलंबिता येतील.
पीकसंरक्षणाचे उपाय पुढे ढकलावे लागतील.

पाऊस अपेक्षित नसेल तर ः
पिकासाठी ओलिताचे नियोजन करावे लागेल.
आंतरमशागतीची कामे उदाहरणार्थ ः निंदणी, कोळपणी, खते देणे इत्यादी.
पेरणी सुरू केलेली नसेल तर पुढे ढकलावी लागेल.

वरील बाबींमुळे बियाण्यांची, खताची व पैशाची बचत होईल. पीकसंरक्षणाचे उपाय अधिक परिणामकारक घडवून आणता येतील आणि पर्यायाने उत्पादन व उत्पन्नसुद्धा वाढेल.
हवामान अंदाज व कीड-रोगांचे नियंत्रण ः

अलीकडे पिकांवर येणारे संभाव्य रोग किंवा किडी आणि त्यांचा हवामानाच्या निरनिराळ्या बाबींशी असलेला संबंध याबाबत अतिशय जागरूकता निर्माण झालेली आहे, तसेच हवामानाचा अंदाज आल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. उदाहरणार्थ ः हवामानाला योग्य असणारे पिकांचे अधिक उत्पादन देणारे वाण निवडणे. खतांची गरजेनुसार मात्रा ठरविणे व ती देणे. कीटकनाशके व बुरशीनाशके योग्य वेळी, म्हणजेच कीड किंवा रोग येणार असे गृहीत धरून त्याची फवारणी करणे; तसेच पाण्याचे पिकांच्या गरजेनुसार नियोजन करणे आणि पिकांच्या कापणीच्या वेळापत्रकाचे नियोजन करणे. या सर्व गोष्टींसाठी मध्यम मुदतीचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
-----

हवेचा वेग आणि दिशा याबाबतच्या अंदाजाचा उपयोग
पिकाच्या मळणीसाठी करून घेता येईल.
पिकावर कीटक व रोगनाशकाची फवारणी किंवा धुरळणी करण्याची दिशा ठरविता येईल.
फवारणी किंवा धुरळणी यांची योग्य वेळ ठरविता येईल.

दिवसाच्या तापमानात वाढ अपेक्षित असेल तर ः
अतिउष्णतेने करपून जाणाऱ्या, नाजूक प्रकारच्या किंवा कोवळ्या झाडांना सावली करून सुरक्षितता पोचविता येते.
महत्त्वाच्या पिकामध्ये योग्य ते आच्छादन टाकता येते.
पिकाला पाण्याचा ताण बसून उत्पादनात घट येऊ नये म्हणून ओलिताचे नियोजन करता येते.

रात्रीच्या तापमानात खूपच घट अपेक्षित असेल तर ः
पिकाला होणारी इजा टाळण्यासाठी ओलिताची उपाययोजना करता येईल.
महत्त्वाच्या पिकांची रोपे पॉलिथिनचा उपयोग करून आच्छादता येतील.

(लेखक कृषी महाविद्यालय, नागपूर येथील अखिल भारतीय समन्वित कृषी-वनशेती संशोधन प्रकल्पात कार्यरत आहेत.)

Source: www.agrowon.com

 


----------------------------------------
[Edit 2 times, last edit by mhajit at Feb 21, 2008 2:50:40 PM]
[Feb 21, 2008 2:40:54 PM] Print Post    Weather Info Report threaten post: please login first  Go to top  

    
Hindi Keyboard   Telugu Keyboard   Kannada Keyboard