' almost All question answered
  Home

     गहू लागवड करायची आहे,
    

गहू लागवड करायची आहे,

१]  लागवडीपूर्वी करायच्या मशागतीची माहीती द्यावी,

२]  कोणते बियाणे निवडावे, जमीन सांगली जिल्हा, मिरज तालुक्यात मालगाव येथे आहे, जमीन निचरा होणारी,  मुरमाड आहे.  पाणी बोअरवेल द्वारे.

३] लागवड करताना करायच्या कामांची माहीती द्यावी, seed treatment, fertilizers, distance etc. 

३] गव्हासाठी रेनगनचा वापर केला चालेल का ? त्याचे फायदे काय?

४] लागवडीनंतर घ्यायची काळजी, पाणी (रेनगनद्वारे), खते, औषधे इ.चे वेळापत्रक.

5) गव्हासाठी सेंद्रिय पध्दतीने रोग व कीड नियंत्रण कसे करावे?

धन्यवाद  !


     Re: गहू लागवड करायची आहे,
    

गहू लागवड

१) गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा.
२) हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे.
३) जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा.

४) पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.

५) पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.
६) उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.
७) जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.

८) बियाणे – गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.
- उशीरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी.
- जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

९) सुधारीत वाण
जिरायत
अ) बन्सी- एन-५९,
ब) सरबती- एन-८२२३,एन,५७४९ आणि एन.आय.५४४९, एन.आय.डी.डब्ल्यू.१५(पंचवटी)

बागायत गहू
वेळेवर पेरणी –एच.डी.२१८९, एच.डी.-२२७८, एच.डी.-२३८०, डी.डब्ल्यू.आर.१६२, एम.ए.सी.एस.२४९६, एम.ए.सी.एस-२८४६, एन.आय.ए.डब्ल्यू.३०१(त्र्यंबक), एन.आय.डी.डब्ल्यू-२९५(गोदावरी)
उशीरा पेरणी – एच.डी-२५०१, एच.आय-२७७ आणि एन.आय.ए.डब्ल्यू.-३४

१०) खते
अ) हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे.
ब) बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.
क) उशीरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खते वरीलप्रमाणेच दोन हप्त्यात द्यावे.
ड) जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
इ) पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीनुसार काही वेळा तुषारच्या तोटीद्वारे, तर काही वेळा रेनगन तोटीद्वारे भिजवल्यास पिकाचे चांगले उत्पादन मिळते. रेनगन पद्धतीच्या वापरासाठी तुषार सिंचन संचाचे पाइप्स आहेत, तसे किंवा थोडेसे फेरबदल करून सहज वापरता येतात. रेनगन पद्धतदेखील तुषार सिंचन पद्धतीसारखीच उपयुक्त असून, कमी अंतरावरची, कमी उंचीच्या (गहू) खुज्या पिकांबरोबरच अगदी उसासारख्या उंच पिकासाठीही सुरवातीच्या काही कालावधीपर्यंत ही पद्धत अतिशय कार्यक्षमतेने वापरता येते.

 

(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)


   
. Home | Login | Registration | Search | Ask Question | My profile | My threads | Forum